अंधेरीतील वाहतूक कोंडी फुटली पूर्वेकडून पश्चिमेला जाणे सोपे झाले

मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर जोडणे आवश्यक होते. दोन्ही पुलांचे जोडकाम पूर्ण झाल्याने हलक्या वाहनांसाठी येथील वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व आणि पश्चिमेकडेवास करणे वाहनचालकांसाठी सोपे झाले आहे.

अंधेरी पूर्व पश्चिम परिसराला जोडणारा, वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे आव्हान महापालिकेच्या अभियंत्यांपुढे होते. यासाठी व्हिजेटीआय तसेच आयआयटी मुंबईचा सल्ला घेण्यात आला. सल्लागारांच्या सल्ल्यानुसार बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १३९७ मिलीमीटर आणि दुस-या बाजूला ६५० मिलीमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीसाठी गेल्या दोन महिन्‍यांपासून अथक काम सुरू होते. हे आव्‍हानात्‍मक काम दिवस रात्र सुरू ठेवून ७८ दिवसात पूर्ण झाले आहे.

दोन्ही पुलांच्या जोडकामानंतर मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे व्हिजेटीआयने घोषित केले आहे. पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधित कामे आणि चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्‍यात आल्‍या आहेत. जुहू पासून अंधेरी असा पश्चिम – पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top