नाशिक – नाशिकच्या अंजनेरी गडावर अडकलेलया १० पर्यटकांची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. हे पर्यटक काल अंजनेरी गडावर फिरायला गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सर्वजण गडावरच अडकले. या पर्यटकांची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिकमध्ये प्रशासनाने पावसाचा अलर्ट देऊनही हे पर्यटक गडावर फिरण्यासाठी गेले होते. मुसळधार पावसामुळे अंजनेरी गडावरील पायऱ्यांवरून वेगाने पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर वनविभागाने धाव घेत बचाव कार्य सुरू केले. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप गडावरून खाली आणले.या घटनेनंतर पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान , पावसाळी पर्यटनादरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरात स्टंटबाजी करणाऱ्या २६ पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २३ हजारांचा दंडही वसूल केला आहे.