मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाडकामानंतर आता सायन रेल्वे पूल १ ऑगस्ट पासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १ ऑगस्ट२०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत हा पूल नव्याने बांधला जाणार आहे.त्यामुळे आता वाहनचालकांना धारावी पुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.
तब्बल १२४ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन सायन रेल्वे पूल नव्याने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मध्य रेल्वे २३ कोटी आणि महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे. हा नवीन पूल सिंगल स्पॅन सेमी-थु गर्डर्स ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा असणार आहे.हा पूल २४ महिन्यांत बांधुन पूर्ण केला जाणार आहे. हा पूल पाडण्यासाठी अनेक अडथळे आले होत़े. विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी हा पूल तोडण्यास विरोध केला होता.हा पूल धोकादायक बनला असल्याचा अहवाल आयआयटी अभियंत्यांनी दिल्यावर सुरुवातीला या पुलावरून जड वाहनांना बंदी करण्यात आली. त्यानंतर आता १ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी करून प्रत्यक्ष पूल उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे.