चेन्नई – सिंधु संस्कृतीतील शिलालेख आणि हस्तलिखितांचा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत अनुवाद करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तब्बल 10 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे बंपर इनाम जाहीर केले आहे. कोणत्याही ऐतिहासिक रहस्याचा उलगडा करण्यासाठी भारतात आजवर लावण्यात आलेले हे सर्वात मोठ्या रकमेचे बक्षीस ठरले आहे.
सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावला. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन यांनी इतिहासकार व इतिहासाचे संशोधन करणार्या संस्थांना सिंधू संस्कृतीतील शिलालेख आणि हस्तलिखितांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी हे अवघड काम करून दाखविणार्या व्यक्ती किंवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून 10 दशलक्ष डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली.
याप्रसंगी स्टॅलिन यांनी सर जॉन मार्शल यांच्या स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरणही केले. एकेकाळी पूर्ण बहरात असलेल्या सिंधू संस्कृतीतील साहित्याचा अर्थ लावण्यात आपल्याला शंभर वर्षांनंतरही अद्याप यश मिळालेले नाही. संशोधनाला प्रोत्साहन म्हणून तामिळनाडू सरकार हे इनाम जाहीर करीत आहे, असे स्टॅलिन बोलताना म्हणाले.