नागपूर- सर्व प्रकारचे वाद मिटविण्यासाठी न्यायालय हे योग्य ठिकाण नाही. अनेक वाद हे मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रभावी मार्गसुद्धा आहे. यामुळे केवळ न्याय दिला जात नाही तर नातेसंबंधही मजबूत होतात, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी व्यक्त केले.
नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या वर्धा मार्गावरील वारांगा परिसरात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश संजीव खन्ना हे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात सरन्यायाधीश खन्ना पुढे म्हणाले की, प्रत्येक प्रकरण हे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न बघता त्याचे मानवी पैलू देखील समजून घेतले पाहिजेत. भारतीय कायदेशीर मदत प्रणाली जगात सर्वात प्रभावी आहे. याठिकाणी आरोपी आणि पीडिताला मदत मिळत असते. सर्व वाद हे न्यायालयीन लढाई लढून सोडविले जावू शकत नाहीत. त्यासाठी मध्यस्थी हा प्रभावी उपाय आहे. त्यातून केवळ तडजोड नाही तर सृजनशील तोडगेही निघू शकतात.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपूरमध्ये विधी विद्यापीठाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या.विकास सिरपूरकर यांच्यामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेची संकल्पना पुढे आली. त्यावेळी राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापित करण्यासाठी मुंबई आणि औरंगाबादमध्ये संघर्ष होता. या संघर्षाचा नागपूरला फायदा झाला आणि राज्यात तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापित करण्याचा निर्णय झाला. नागपूरचे विधी विद्यापीठाचे संकुल देशातील सर्वोत्तम विधी विद्यापीठांपैकी एक आहे, असे गौरवोद्गार न्या.भूषण गवई यांनी काढले.