चेन्नई – सरकारने राबवलेल्या सरकारी योजना व त्यांचे थेट खात्यात जमा होणारे पेसे यामुळे बांधकामविध कारणांनी लोक गावाबाहेर जाऊन काम करत नसल्याबद्दल लार्सन अँण्ड टुब्रो कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक एसएन सुब्रमण्यम यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते सीआयआयच्या दक्षिण आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बांधकाम क्षेत्रापुढील अनेक आव्हानांचा आढावा घेतला.
एस. एन. सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी आठवड्यात ९० तास करा. घरी बसून आपल्या पत्नीकडे किती काळ बघत बसणार, असे वादग्रस्त विधान केले होते. आता नव्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
सुब्रमण्यम म्हणाले की, विविध सरकारी योजनांमुळे व गावातील सुखी जीवनाच्या आकर्षणामुळे अनेकजण काम करायला बाहेर जात नाहीत. आमच्याकडे सध्या अडीच लाख कर्मचारी व ४ लाख मजूर काम करत आहेत. असे असले तरी कामगारांच्या उदासिनतेमुळे आणखी मजूर मिळतील की नाही ही चिंता मला सतावते. सध्या मजूर संधीच्या शोधात बाहेर पडत नाहीत. कदाचित स्थानिक अर्थकारण चांगले असावे. विविध सरकारी योजना व त्यांचे थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने कामासाठी कुठे दूर जावे असे त्यांना वाटत नाही. आम्ही परदेशातील कामांमध्ये मजूरांची नियुक्ती करण्यासाठी एक विशेष एचआर टीम तयार केली आहे. मात्र, मजूर मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. सध्या देशात बांधकाम व्यवसायाला कुशल व अर्धकुशल मजुरांची कमतरता आहे. त्यामुळे देशातील अनेक प्रकल्पांच्या पूर्ततेत विलंब होऊ शकतो. बाहेर जाऊन काम करण्याबाबतची उदासिनता केवळ मजुरांमध्येच नाही तर ती अधिकाऱ्यांमध्येही आहे. मी या कंपनीत एक पदवीधर अभियंता म्हणून नियुक्त झालो होतो. त्यावेळी माझ्या वरिष्ठांनी मला म्हटले की, तू चेन्नईचा आहेस ना, मग दिल्लीत जाऊन काम कर. मी आज जर कोणाला असे सांगितले तर तो कंपनीच सोडून जाईल. सध्या काम करवून घेणे कठीण होत चालले आहे. आता आमच्या मनुष्यबळ विकासची धोरणे अधिकाधिक लवचिक करण्यावर आम्ही भर देत आहोत.