शिंदे गटाला मान्यता देणार्‍या राहुल नार्वेकरांवर उद्धव ठाकरे मेहेरबान का? उमेदवार दिला नाही

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती आणि मविआने उमेेदवार जाहीर केले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षपदावर असताना ज्या व्यक्तीने शिवसेनेच्या फुटीवर शिक्कामोर्तब करत शिंदे गटाच्या हवाली शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले ते राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआने उमेदवारच दिलेला नाही. ज्या राहुल नार्वेकर यांच्यामुळे शिवसेना कायमची फुटली त्या राहुल नार्वेकरांमुळे उद्धव ठाकरे इतके मेहेरबान का झाले आहेत, असा प्रश्‍न विचारला जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी भाजपाकडून कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून सूर्या जैन या तरुणाने सामना करण्याची घोषणा केली आहे. हा सूर्या जैन भाजपातील ज्येष्ठ नेते मंगलप्रभात लोढा यांचा खास कार्यकर्ता आहे. मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांचे पटत नसल्याने नार्वेकर यांची मते खाण्यासाठी मुद्दामहून जैन समुदायातून लोढा यांनी उमेदवार दिला, अशी चर्चा आहे. मात्र नार्वेकर यांच्या विरोधात एकही उमेदवार मविआने अद्याप दिलेला नाही. हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. गेल्या निवडणुकीत येथून काँग्रेसचे भाई जगताप निवडणूक लढले होते. मात्र नार्वेकर यांच्यासमोर त्यांचा कोणताही टिकाव न लागल्याने त्यांनी यावेळेस माघार घेतली आहे. परंतु भाई जगताप यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा, अशी चर्चाही मतदारसंघात नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे राजकुमार बाफना यांचेच नाव आहे. ते तुल्यबळ नसले तरी नावापुरता उमेदवार द्यायचा तर हा एकच उमेेदवार उपलब्ध आहे. राजकुमार बाफना यांनी गणेशोत्सवात अनेक मंडळांना आर्थिक मदत करून आपल्या उमेदवारीची तयारी केली होती. परंतु त्यांना तिकीट द्यायचे तर त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल. उद्या उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आलेला असताना अजूनही त्यांच्याबाबत कोणतीही चर्चा नाही. ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवतील का? अशी कोणतीही हालचाल नाही. यामुळेच उद्धव ठाकरे आणि मविआने हा मतदारसंघ राहुल नार्वेकर यांना देऊन टाकला आहे, असेच चित्र आहे. मात्र ही मेहेरबानी का करण्यात आली याचे उत्तर मविआतील एकही नेते देण्यास तयार नाही.
राहुल नार्वेकर यांचा विजय यामुळेच सुकर झाला आहे. विरोधात एकही तगडा उमेदवार नाही. घरातीलच दोघेजण नगरसेवक आहेत हा राहुल नार्वेकर यांच्यासाठी जमेचा विषय आहे. राहुल नार्वेकर यांचा भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी अर्शिता हे दोघेही स्थानिक
नगरसेवक आहेत.

अहिल्यानगरमधूनही शिवसेना संपवली
अहिल्यानगर शहर हा अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे. उबाठा गटाचे माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी हा मतदारसंघ उत्तमरित्या बांधलेला आहे. यामुळे या मतदारसंघातून उबाठाचा विजय होईल, अशी पूर्ण तयारी होती. असे असताना उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडून दिला. त्यामुळे नगर जिल्ह्याचे उबाठा कार्यकर्ते प्रचंड नाराज असून, बंडखोरीच्या तयारीत आहेत. हक्काचा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांनी कोणते गणित मांडून सोडला या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना हवे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top