दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल दिल्लीतील एका आईस्क्रीमच्या दुकानाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे कोल्ड कॉफीही बनवली. या दुकानाच्या भेटीचा व्हिडिओ त्यांनी एक्सवरदेखील पोस्ट केला.
या भेटीसंदर्भात त्यांनी एक्सवर लिहिले की, केव्हेंटर्ससारख्या व्यावसायिक कंपन्या आपल्या देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच, जुन्या व्यवसायाला नवीन पिढी आणि नवीन बाजारापेठेसाठी कशाप्रकारे तयार केले जाऊ शकते, यासंदर्भात या कंपनीच्या युवा संस्थापकांशी चर्चा केली.
या भेटीत, गांधी यांना दुकानातील कर्मचाऱ्यांनी कोल्ड कॉफी कशी बनवतात हे पहायचे का , असे विचारल्यावर गांधी यांनी स्वतः कोल्ड कॉफी बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी दूध, आइस्क्रीम टाकून मिक्सरच्या सहाय्याने केव्हेंटर्स सिग्नेचर बॉटलमध्ये कॉफी ओतली.
तसेच, या भेटीदरम्यान, राहुल गांधी यांनी दुकानाच्या सह-संस्थापकांशी त्यांचा व्यवसाय, आव्हाने आणि भविष्यातील नियोजन याविषयी चर्चा केली.यादरम्यान, दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला आत बोलावून तिच्या तब्येतीची चौकशी केली. त्यावेळी त्या महिलेने राहुल यांना दुकानाच्या वर असलेल्या घरी निमंत्रण दिले. परंतु राहुल तिच्या घरी पोहचल्यावर दाराच्या चाव्या हरवल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी सर्वांचाच हशा पिकला. पुढच्या भेटीत घरी येईन, असे आश्वासन राहुल यांनी वृद्ध महिलेला यावेळी दिले.