नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात १७ मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १७ मुलांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. यामध्ये ७ मुले आणि १० मुलींचा समावेश होता. सदर बाल पुरस्कारासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे भारताचे नागरिक असलेल्या वय वर्ष ५ ते १८ दरम्यानच्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात. तसेच, कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण या सात श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण होते.
या सोहळ्यात जननी नारायणन, सांची अग्रवाल,लोना थापा,सिंधुरा राजा, सान्वी सूद,हेमवती नाग, करीना थापा,प्रीतीस्मिता भोई, गोल्डी कुमारी,अयान साजद, व्यास ओम जिग्नेश,सौरव कुमार, रीशिक कुमार,अनिश सरकार, आरव भारद्वाज यांना पुरस्कार प्राप्त झाले.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मला तसेच संपूर्ण देशाला व समाजाला तुमचा अभिमान आहे. तुमचे कर्तृत्व आश्चर्यकारक व विलक्षण आहे. मुलांच्या कलागुणांना संधी देणे आणि त्यांचा आदर करणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. ही परंपरा आणखी दृढ होणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मोदींनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची भेट घेतली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा एक देशव्यापी उत्सव आहे, ज्यामध्ये भारताच्या भविष्याचा पाया म्हणून मुलांना सन्मानित केले जाते. तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारने वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मरणार्थ वीर बाल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. मी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे की, आता फक्त सर्वोत्तम हेच आमचे मानक असले पाहिजे. युवा पिढीने ते ज्या क्षेत्रात आहेत, ते सर्वोत्तम करण्यासाठी काम करा.
महाराष्ट्रातील अमरावतीच्या करीना थापालादेखील तिच्या शौर्या साठी पुरस्कार मिळाला. १७ मे २०२४ रोजी कठोरा परिसरात जय अंबा अपार्टमेंट च्या दुसऱ्या माळ्यावर सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. अवघ्या १७ वर्षांच्या करीनाने प्रसंगावधान राखून, आगीतून निघणारे धुरांचे लोट, गरम टाइल्स, आणि श्वास गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना करत तिने लोकांचा जीव वाचवला होता. करीनाने केलेल्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. तिने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले. या कार्याची दखल सरकारने घेत तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला.