मुंबई- मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील चार चाकी गाड्यांच्या पार्किंगचे शुल्क चौपटीने म्हणजेच २० रुपयांवरून थेट ८० रुपये करण्यात आले आहे, तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारे दहा रुपयांचे शुल्क ३० रुपये करण्यात आले आहे.त्यामुळे याठिकाणी वाहने घेऊन जाणार्या पर्यटकांचे प्राणीदर्शन महागणार आहे.
पेंग्विन दर्शन घडवणार्या या उद्यानाला मुंबई आणि महाराष्ट्रासह देश- विदेशातील पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.पेंग्विन आणल्यानंतर उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न तब्बल सहा ते आठ पटींनी वाढले आहे.याठिकाणी प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी २५ रुपये,प्रौढांसाठी प्रत्येकी ५० रुपये आणि २मुलांसह २ प्रौढांसाठी ४ जणांच्या कुटुंबाला एकत्रित १०० रुपयांत संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालय पाहता येत आहे. पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.शिवाय या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर वाघ,बिबट्या, हत्ती, हरीण, तरस, माकड, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशु-पक्षी व दुर्मिळ,औषधी झाडे पाहता येतात.या ठिकाणी येणाऱ्या मोठय़ा प्रमाणावरील पर्यटकांकडे स्वतःची वाहने असतात. त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था आहे.या पार्किंगसाठी आता जानेवारीपासून दरवाढ लागू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान,या उद्यानाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी म्हटले आहे की,प्राणी संग्रहालयाच्या आवारात परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. याठिकाणी संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये जमा केले जात होते. त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसानही होते. शिवाय काही जणांकडून या पार्किंगचा गैरफायदा घेतला जात असल्याने ही दरवाढ केली आहे.