यंदा लाल तिखट महागणार मिरचीच्या उत्पादनात घट

नंदुरबार- देशातील मिरची उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा अति पावसामुळे मिरचीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी आवक कमी झाली आहे.परिणामी यंदा लाल तिखट म्हणजेच लाल भुकटी महाग होणार आहे.

मिरची सुकवून प्रक्रिया केल्यानंतर तिची लाल भुकटी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. नंदुरबार बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिरचीची आवक सुरु झाली. जवळपास तीन महिन्यात आतापर्यंत ४५ ते ५० हजार क्विंटल आवक झाली आहे. प्रारंभी ओल्या लाल मिरचीला २५०० ते चार हजार रुपये असा भाव मिळाला. सध्या तीन हजार ते ५१०० रुपये असा भाव मिळत आहे. जेमतेम दीड महिन्याचा हंगाम बाकी असून उर्वरित दिवसात ५० हजार क्विंटल आवक होण्याचा अंदाज आहे.

नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रातील विशेषतज्ज्ञ पदमाकर कुंदे म्हणाले की, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला.या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते.त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली.त्यातच पावसामुळे निंदणी, कोळपणी ही कामे करण्यात अडथळा आला. परिणामी, रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याने मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे.नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षीच्या तुलनेत मिरची आवकमध्ये मोठीच घट पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे भावही वाढले असून सध्या सरासरी ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव दिला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top