नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे केला. यावेळी त्यांनी संविधान, ईव्हीएममधील घोळ त्याचप्रमाणे निवडणुकीतील गैरप्रकारांवर जोरदार प्रहार केला.
खरगे म्हणाले की, मोदी धर्मा धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रय़त्न करीत आहेत. देशातील तरुणांना निश्चित दिशा देण्याऐवजी त्यांना मशीदीखालील शिवमंदिरे दिसत आहेत. असेच असेल तर उद्या लाल किल्ला पाडा, ताजमहाल पाडा, कुतुबमिनार पाडा, देशात हे काय चालले आहे? मी हिंदू आहे माझे नाव ज्योतिर्लिंगावरुन आहे तरी मला कधीही धर्मनिरपेक्ष राहण्यात किंवा सगळ्यांशी चांगले वागण्यात कोणीतीही अडचण आली नाही. सरकारने सर्वांना एकत्र घेऊन चालले पाहिजे. या देशासाठी या स्वातंत्र्यसाठी खूप लोकांनी त्याग केलेला आहे. त्याची आठवण ठेवली पाहिजे. केवळ भविष्याचा विचार करुन चालणार नाही तर आपल्या भूतकाळाविषयीही आपल्याला आदर असायला हवा.