नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील नमो भारत रेल्वेच्या उद्घाटनासह 12 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी केली. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा दोन दिवसांतील दुसरा सार्वजनिक कार्यक्रम होता. पहिल्या कार्यक्रमातून आपवर जोरदार टीका करत भाजपाच्या प्रचाराला सुरुवात करणार्या मोदींनी आजच्या कार्यक्रमातही आपचा ‘आपदा’ असा उल्लेख करत चौफेर हल्ला केला. ते म्हणाले की, या ‘आपदा’ने दिल्लीची 10 वर्षे वाया घालवली असून, ती आणखी सहन करणे शक्य नाही. यावेळी तिला मुक्ती द्या. यासाठी दिल्लीकरांपुढे भाजपा हाच पर्याय आहे.
गझियाबादमधील साहिबाबाद ते दिल्लीतील न्यू अशोक नगर दरम्यान नमो भारत रेल्वेच्या 13 किलोमीटरच्या टप्प्याचे मोदींनी उद्घाटन केले. त्यांनी या मेट्रो ट्रेनमधून प्रवासही केला. त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, दिल्लीचा भाजपावर विश्वास आहे. भाजपा हा सुशासन, सेवाभावाने सामान्यांची स्वप्ने करणारा पक्ष आहे. भाजपा सर्वसामान्यांचे कल्याण करणारा पक्ष असून, संपूर्ण देशाने भाजपावर विश्वास दाखवला आहे. जनता भाजपाला वारंवार संधी देत आहे. आपच्या ताब्यात असलेल्या दिल्लीत मात्र सर्वच आनंदीआनंद आहे. रस्त्यांवर खड्डे पडले असून, दिल्लीत सर्वत्र गटारांचे पाणी वाहत आहे. आपचे सरकार दिल्लीकरांना पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. हिवाळ्यातील वायुप्रदूषण रोखू शकत नाही. याचे सारे लक्ष केवळ शिशमहल बनवण्याकडे आहे. त्यांनी केंद्राच्या सर्वच योजनांमध्ये खोडा घातला आहे. दिल्लीत आयुष्यमान योजना राबवू दिली नाही. पंतप्रधान आवास योजनेची 30 हजार घरे लोकांना मिळू दिली नाहीत. त्यांनी केवळ जनतेच्या पैशांचा अपव्यय केला आहे. कोरोना काळातील कोट्यवधी रुपयेही यांनी शिशमहल बनवण्यासाठी वापरले. दिल्लीची 10 वर्षे त्यांनी वाया घालवली. या सार्या ‘आपदा’ म्हणजेच संकटातून दिल्लीकरांना बाहेर आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. इथे डबल इंजिनचे सरकार आल्यावर दिल्लीची स्थिती सुधारेल.
मोदी पुढे म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत कमळ फुलेल. दिल्लीची सत्ता मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. दिल्लीकरांना आपदेतून मुक्ती मिळायला हवी. भाजपाला दिल्ली हे जगातील
सर्वोत्कृष्ट राजधानीचे शहर बनवायचे आहे. इथे गरीब, मध्यमवर्गीय व तरुणांच्या विकासाची मोठी संधी देण्यात येणार आहे. दिल्लीसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 75 हजार कोटी रुपये दिले. दिल्लीतील ज्या महत्त्वाच्या संस्था, रुग्णालये, रस्ते व मेट्रो सेवा आहेत त्यांची जबाबदारी भाजपाच्या केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे या सेवा योग्य रितीने सुरू आहेत. आप पक्ष हा भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला असून, त्यांनी मद्य, शाळा व आरोग्यसेवेमध्ये मोठे भ्रष्टाचार केले. जनतेचा पैसा लुटला आहे. भाजपा सर्व योजना सुरू ठेवेल व अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून देईल. यासाठी दिल्लीकरांनी भाजपाला
मतदान करावे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, मोदी यांनी केलेल्या 38 मिनिटांच्या भाषणातील 29 मिनिटे त्यांनी दिल्लीकरांचा अपमान केला. आमचा पक्ष दिल्लीकरांसाठी काम करत आहे. भाजपानेच प्रत्येक वेळी दिल्लीची कामे थांबवली. सीसीटीव्ही, मोहल्ला क्लिनिकचे काम थांबवले. आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. पण आम्ही कधी याचा मुद्दा केला नाही. आमच्यावर अनन्वित अत्याचार केले. आम्ही या योजना थांबवल्या असत्या तर पंतप्रधान या योजनांचे उद्घाटन करू शकले नसते. दिल्लीची जनता पंतप्रधानांनी केलेल्या या अपमानाला येत्या निवडणुकीत योग्य उत्तर देईल. आम्हाला वाटले होते की, पंतप्रधान काहीतरी भविष्यकालीन योजनांविषयी बोलतील. तसे न करता ते केवळ आमच्या विरोधातच बोलत राहिले.