जे. जयललिता (तामिळनाडू)
जयराम जयललिता या भारतातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाकांक्षी महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातात. अम्मा या नावाने प्रसिद्ध असलेल्या जयललितांनी 1991 ते 2016 दरम्यान पाच कार्यकाळात चौदा वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.
मूळच्या सिनेअभिनेत्री असलेल्या जयललिता यांची आयुष्याचा पटही एखाद्या सिनेमासारखाच रंजक होता. एमजी रामचंद्रन यांच्याबरोबर अनेक चित्रपटांत भूमिका करणार्या जयललिता यांनी 1982 मध्ये ते मुख्यमंत्री असताना अण्णा द्रमुक या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा झपाट्याने राजकीय उदय झाला. काही वर्षांतच त्या पक्षाच्या प्रचार सचिव बनल्या. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. 1987 मध्ये एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांनी स्वत:ला त्यांचे राजकीय वारस म्हणून घोषित केले. एमजीआरच्या पत्नी व्ही. एन. जानकी रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील गटाशी लढा देऊन त्यांनी पक्षावर वर्चस्व प्रस्थापित केले. जानकी यांची राजकीय कारकीर्द त्यांनी जवळजवळ संपुष्टात आणली.
1991 मध्ये जयललिता तामिळनाडूच्या प्रथमच सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी 12 मे 1996पर्यंत पदभार सांभाळला. 14 मे 2001 रोजी जयललिता यांनी दुसर्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या 21 सप्टेंबर 2001 पर्यंत या पदावर राहिल्या.
2 मार्च 2002 रोजी त्या तामिळनाडूच्या तिसर्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्यांची ही कारकीर्द 12 मे 2006 पर्यंत टिकली. 16 मे 2011 ते 27 सप्टेंबर 2014 या काळात त्या चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 23 मे 2015 रोजी त्यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्या 5 डिसेंबर 2016 पर्यंत या खुर्चीवर होत्या.
जयललितांच्या या मुख्यमंत्रिपदाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यांच्याविरोधात कटकारस्थाने करण्यात आली. 2014मध्ये जयललिता यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांना न्यायालयाने 4 वर्षांचा तुरुंगवास, 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. नंतर कर्नाटक हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. जयललितांच्या चेन्नईतील पोस गार्डन निवासस्थानावर छापा टाकण्यात आला, तेव्हा त्यात 10,500 साड्या, 750 शूज व चप्पल, 91 घड्याळे, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोन्याच्या वस्तू अशी अफाट संपत्ती सापडली होती. 1998 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एआयडीएमकेने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठिंबा दिला होता. तो काढून घेतल्याने वाजपेयी सरकार अवघ्या एकमताने 13 दिवसांत कोसळले होते. यासाठीही जयललिता
लक्षात राहतील.