मुंबई – जगातील सर्वांत मोठा धोबी घाट म्हणुन मुंबईतील महालक्ष्मी येथील धोबी घाटाची नोंद आहे. या धोबी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड आणि चिंध्यांचा वापर आगभट्ट्यांमध्ये केला जातो. यामुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने पालिकेने या भट्ट्यांमध्ये पीएनजीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यादृष्टीकोनातून त्याठिकाणी पीएनजीची उभारणी केली जाणार असून धोबी घाटाला पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा केला जाणार आहे.
या धोबी घाटाचा विस्तार सुमारे ८१.४९ चौ.मी असून सन २०११ मध्ये जगातील सर्वांत मोठा धोबी घाट म्हणून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे नोंद झाली आहे. धोबी घाटावर काम करणारा धोबी समाज हा धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादितशी संलग्न आहे. धोबी घाटातील कामगारांना दैनंदिन कामकाजा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. याच संस्थेने आणि धोबी घाट समाजाने स्वतंत्र पाईप गॅस जोडणीची मागणी केली होती. ही मागणी आता पालिका पूर्ण करणार आहे. या कामांसाठी पालिकेच्यावतीने सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओशिऍनिक इंजिनिअर्स अँड कन्सल्टंस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
याठिकाणी कपडे वाळविणे आणि कपड्यांना इस्त्री करणे, या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर, भट्टी जाळण्यासाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सामुग्रीसह रसायने असलेल्या चिंध्या, टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर केला जातो. यातून लोकांमध्ये दमा, क्षयरोग तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाणे वाढले आहे. तसेच वायू प्रदूषण होत आहे. याला आळा बसावा म्हणूनच आता ही पीएनजी उभारणी केली जाणार आहे.