प्रयागराज- प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते काही कक्षांचे उद्घाटनही होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उद्याच्या भेटीत ते स्वच्छ व हरित महाकुंभ या संकल्पनेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामध्ये रस्त्यांचे नुतनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रयागराज विकास प्रधिकरण हे काम करणार असून सार्वजनिक बांधकाम खाते सौर्द्यीकरणाचे तसेच दिवाबत्तीच्या सोयीचे काम करणार आहे. प्रयागराज महानगरपालिका शहरात विविध स्वागत कमानी उभारणार असून योगी आदित्यनाथ हे महाकुभ नगरच्या तयारीचा आढावा घेतील. त्यांच्याहस्ते खोया पाया केंद्रांचे उद्घाटन होईल. ते भाविकांच्या निवारागृहांची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतील. ते अलोपीबाग मार्गावरील फ्लायओव्हर तसेच बंध रोड, त्रिवेणी पुष्प तसेच सांडपाणी प्रकल्पाचीही पाहणी करणार आहेत.