मुंबई – महाविकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र निर्माण झाल्याने महायुतीची झोप उडाली आहे. त्यासाठीच महायुतीने आता नवीन खेळी करून मविआची मते खेचण्यासाठी आपापल्या मित्रपक्षांना स्वतंत्र अशी तिसरी आघाडी स्थापण्याची प्रेरणा दिली आहे. ही तिसरी आघाडी उद्यापासून ओल्या दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. या तिसर्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले किंवा मविआला मतदान करू नका, असे सांगितले तर महायुतीचा मार्ग सुकर होईल.
महायुतीसोबत असलेले मित्रपक्षातील नेते छत्रपती संभाजी राजे, आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते राजू शेट्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवे उभरते नेतृत्व राजरत्न आंबेडकर या सर्वांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच काल अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे- पाटीलही तिसर्या आघाडीबरोबर जाण्याची शक्यता असून, उद्याच्या पाहणी दौर्यात तेही सहभागी होऊ शकतात. छत्रपती संभाजी राजे यांनी थेट राज्यसभेची खासदारकी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पाठिंबा न मिळाल्याने अखेर त्यांनी स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. सध्या त्यांची राजकीय ताकद फारशी नसली तरी त्यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग आहे आणि हा वर्ग निवडणुकीत त्यांच्याबरोबर राहण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू हे सत्तेतील आघाडीसोबत असतात. अपंग आणि शेतकरी वर्गाचे ते प्रतिनिधीत्व करतात. त्यांची नेमकी अशी रणनिती नसून आपल्या धोरणाला जेथून फायदा होईल त्यांना ते साथ देत असतात. हाच प्रकार शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आहे. शरद पवार यांच्या विरोधात बारामतीत जाऊन दंड थोपटणारे राजू शेट्टी हे नंतर शरद पवारांबरोबरच हात मिळवणी करताना दिसले. राजरत्न आंबेडकर हे नवे नेतृत्व निर्माण झाले असून, ते कोणत्या दिशेने जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे. जरांगे-पाटील सध्या भाजपा आणि फडणवीस यांच्याविरोधात बोलत असले तरी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भुजबळ सोडून इतर अजित पवार गट यांच्याविरोधात ते वक्तव्य करत नाहीत. किंबहुना एकनाथ शिंदे यांची त्यांना सतत साथ आहे, अशी चर्चा असते. महाविकास आघाडीला सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांची मते कमी करण्यासाठी अनेक राजकीय हालचाली सुरू आहेत. मनसेचे राज ठाकरे गट हा उद्धव ठाकरे गटाविरोधात विधानसभा लढवेल हे आधीच उघड झाले आहे. यानंतर आता मविआची मते आणखी कमी करण्यासाठी तिसर्या आघाडीला ताकद देण्याचे काम सुरू आहे. महायुती विरुद्ध मविआ असा एकासएक सामना होऊ द्यायचा नाही असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. या सर्व गोष्टींचा महायुतीला निश्चितच फायदा होईल. महायुतीत, मनसे, तिसरी आघाडी या विरोधात लढताना मविआला निश्चित घाम फुटेल.
मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यात सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक मतदारसंघात घोंगडी बैठक घेत आहेत. आज त्यांची परळी, बीड येथे घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याआधीच मध्यरात्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंतरवाली सराटीमध्ये त्यांची भेट घेतली. सरपंचाच्या घरात झालेल्या या भेटी दरम्यान दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीबाबत बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांसाठी चांगले काम केले, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली.