मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या २९ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे.मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार आणि हार्बर रेल्वेच्या पनवेल आणि वाशी मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ वाजल्यापासून ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.तसेच, या लोकल भायखळा, परळ,दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. शिवाय सकाळी १०.१९ वाजल्यापासून ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.
तसेच हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सकाळी १०.३३ वाजल्यापासून ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटी- पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी ९.४५ वाजल्यापासून ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत.तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.०२ वाजल्यापासून ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल फेऱ्या आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी १०.०१ वाजल्यापासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत.