नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाला जाहीर झाला. या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा पैसे वाटप करत असल्याचा आणि दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू करण्यात आल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर काँग्रेस आणि आपचे मनोमिलन झाले असते तर ही परिस्थिती आली नसती, असे सांगत त्यांनी काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या.
संजय राऊत म्हणाले की, आमची कालच राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेले आहे. महाराष्ट्रात त्यांना त्या पॅर्टनचे यश मिळाले. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान १५ ते २० हजार मते वाढवली. ही ३९ लाख मत आली कुठून आणि जाणार कुठे ? असे मला विचारले तेव्हा मी सांगितले की त्यातली काही मत बोगस मतदार ही दिल्लीमध्ये वळवली आणि त्यानंतर ३९ लाख मत तशीच्या तशी बिहार निवडणुकीत जातील. फॉर्मुला ठरलेला आहे. केजरीवाल यांनी १० वर्ष उत्तम काम केले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकारण व्यक्तीगत पातळीवर नेतात. कारण ते व्यापारी आहेत. दिल्ली लहान राज्य आहे. पैसे शेवटच्या मिनिटांपर्यंत वाटत होते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले दिल्लीत होतो मी त्यादिवशी. टेबल टाकून पैशाचे वाटप सुरु होते. पोलिसांना सूचना होत्या तक्रार घ्यायच्या नाहीत. अशाप्रकारची निवडणूक देशामध्ये कधी लढली गेली नव्हती.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत काँग्रेस आणि आपचे मनोमिलन झाले असते तर ही परिस्थिती झाली नसती. आप आणि काँग्रेस यांचे स्पर्धक भाजपा आहे. भाजपाला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेसही लढत आहे, पण स्वतंत्र लढत आहेत. एकसाथ असते तर पहिल्या तासाभरातच भाजपाचा पराभव झाला असता.