नागपूर- नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बीड व परभणीतील घटनांवर सविस्तर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विरोधकांची ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळून उद्या नियम १०१ अंतर्गत या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विरोधकांनी सरकारचा निषेध करून सभात्याग केला. दरम्यान, विरोधक परभणी आणि बीडला जाऊन मोर्चा काढणार आहेत.
माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना एवढे पाशवी बहुमत लोकांचा जीव घेण्यासाठी दिले का? गुंडांना संरक्षण देण्यासाठी दिले का? आम्ही मागण्या केल्या, तर आमचा आवाज दाबला जातो. आम्ही अधिवेशनात मागणी करत आहोत, मग सरकार का घाबरत आहे? तातडीने चर्चेसाठी तयार का होत नाही? याचा अर्थ दाल में कुछ काला है. सरकार दलितांवरील अत्याचारांकडे डोळे झाकून दुर्लक्ष करते आहे. कुणी मरो, वाचो याच्याशी काहीही देणेघेणे सरकारला नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध केला. आम्ही सगळे उद्या परभणीला जाणार आहोत. मोर्चाही काढणार आहोत. या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला आहे.
शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वाल्मिक कऱ्हाड फोनवरून धमकी देतो, त्याची चौकशी होत नाही. वाल्मिक कऱ्हाड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध तपासावेत. बीडमधील वाल्मिक कऱ्हाड कोण आहे? खंडणी प्रकरणात आरोपी होता. खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींच्या संपर्कात असताना, त्याला आरोपी का केले नाही? त्याची चौकशी का होत नाही? सरकारपेक्षा हा वाल्मिक कऱ्हाड मोठा आहे का? दोन गंभीर विषयावरून महाराष्ट्र अस्वस्थ आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्याचे गांभीर्य नाही. महाराष्ट्राच्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला. पुढील आठवड्यात बीडमध्ये मोठा मोर्चा काढणार आहोत. उद्या आम्ही सर्व विरोधक परभणीत जात आहोत.