बीडमध्ये डझनभर हत्या झाल्या! संतोषही गेला! अनेक संसार उद्ध्वस्त! धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या

बीड- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मोठा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात सर्वच नेत्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली. यावेळी बोलताना भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गोली मार भेजेमे नाहीतर गोली मार किधर भी, असे सुरू आहे. आतापर्यंत इथे अनेक हत्या झाल्या. या लोकांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. जमिनी लाटल्या. अशा लोकांना बिनभाड्याच्या खोलीतच पाठवायला हवे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.
बीडमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असा हा सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, भाजपा आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार आमदार प्रकाश सोळुंके, आमदार नरेंद्र पाटील हे नेते सहभागी झाले होते. मृत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांसह हजारो लोकांचाही या मोर्चात सहभाग होता. मोर्चातील आंदोलकांनी निषेध म्हणून काळ्या फिती बांधून, काळे झेंडे व निषेधाची पोस्टर हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद होती. सुरक्षेच्या दृष्टीने अप्पर पोलीस अधीक्षक, 4 उप अधीक्षक, 2 राज्य सुरक्षा दलाच्या तुकड्यांसह 400 पोलीस कर्मचारी व आरपीएफ तैनात होते.
या मोर्चानंतर भाषण करताना आ. धस यांनी मुंडे बंधूभगिनीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गोली मार भेजेमे नाहीतर गोली मार किधर भी, असे सुरू आहे. अनेकांकडे सध्या बंदुकीचे परवाने आहेत. हे परवाने ज्यांनी दिले त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही पाच वेळा आमदार झालो आहोत. मात्र आम्हालाही याठिकाणी सुरक्षा मागावी लागते. संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून झाला तो निर्घृण होता. त्यांच्या शरीरात दोन लिटर रक्त गोठले होते. त्याला प्रचंड मारहाण झाली होती. या लोकांनी असे अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. जमिनी लाटल्या, खून पाडले. शिरसाळ्याची गावरान जमीन ढापली आणि निसार पटेलची हत्या केली. त्याच्या मुलाला सरपंच पदावरून काढले. तो कोर्टात गेला आणि पुन्हा सरपंच झाला. संगीत दिघोळे, वसंत गीते, बंडू मुंडे, बापू आंधळे अशा अनेकांची इथे हत्या झाली. विशेष म्हणजे ही हत्या करणारे त्यांच्या घरी पाणी भरतात तसे ज्यांची हत्या झाली त्यांच्या घरचेही त्यांच्याकडे पाणी भरतात. हा परळी पॅटर्न आहे. मांजर सुभ्याला रसाळांची जमीन घेतली. वाल्मिकला तिथे पोहण्याचा तलाव टाकायचा आहे. दिघोळला नजर पोहोचत नाही इतकी आकाची जमीन आहे. बीड जिल्ह्याची करुणा नाही, तर करुण कहाणी आहे. करुणा कहाणी फार वेगळी आहे. पहिल्या पत्नी आहेत. त्यांचे खूप हाल होत आहेत. या लोकांना बिन भाड्याच्या खोलीत पाठवल्याशिवाय राहाणार नाही.
धस म्हणाले की, तीन वेळा लोकांमधून निवडून सरपंच झालेल्या संतोष देशमुखची दुर्देवी हत्या झाली. त्यांच्यात नेतृत्वगुण होते. त्यालाच या लोकांनी संपवले. संतोष देशमुख यांना मारण्याची ही कोणती पद्धत? तुम्हाला माणसे मारण्याचा अधिकार कोणी दिला? या देशात मुंगीलाही मारण्याचा कुणाला अधिकार नाही. याच संतोष देशमुखने विरोध असतानाही मस्साजोगमध्ये पंकजा मुंडे यांचे स्वागत केले होते. विधानसभा निवडणुकीत ते नमिता मुंदडा यांचे बुथप्रमुख होते. त्यांचा खून झालेले कोणालाही पटलेले नाही. तरीही काहीजण समाजमाध्यमावर ऐसा करेंगे वैसा करेंगे करत आहेत. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नावे ठेवत आहेत ते आता मुख्यमंत्र्याच्या जवळ जात आहेत. हे लोक माझी औकात काय असे विचारतात. तर मी 80 हजारांनी निवडून आलो आहे. ही माझी औकात आहे. धनूभाऊ, तुम्ही 1 लाखाच्या मताधिक्क्याने निवडून आलात, पण तुम्ही बोगस मतांवर निवडून आला आहात. शाई एकाच्या बोटाला तर मतदान दुसरा करत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांची निवड ही बोगस आहे. बीडमध्ये खंडणीचे रॅकेट कोण चालवते? वाळूची, राखेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे त्या मागे कोण आहे? पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना त्यांनी या गोष्टी का थांबवल्या नाही? याचे कारण हे दोघेही वेगळे दिसत असले तरी आतून एकच आहेत. पंकजा ताईंकडून धनूभाऊने सर्व काढून घेतले, हे त्यांना कधी समजलेच नाही. आता सर्व काही आका सांभाळत आहेत. मी पंकूताईंना विचारतो की, तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाहीत? तुम्हाला हुजरेगिरी करणारे आवडतात. परंतु आम्ही तुमच्या पुढे हुजरेगिरी करणार नाही. तुम्ही संतोष देशमुखच्या घरी गेले पाहिजे होते. तुम्ही आला नाहीत ही तुमची मोठी चूक होती. तुम्ही का आला नाही? याचे उत्तर द्या.
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या होऊन 19 दिवस झाले, तरीसुद्धा काही आरोपी अद्याप मोकाट आहेत. वाल्मिक कराडलासुद्धा अटक झालेली नाही. 5 पैकी 4 वर्षे धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्रिपद भाड्याने दिल्याची टीका केली होती. पालकमंत्रिपद वाल्मिक कराडला भाड्याने दिले होते का? पालकमंत्र्याचे सर्व अधिकार मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव आणत कोणालाही अटक करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. या काळात अनेक निर्दोष नागरिकांवर खटले दाखल झाले. परळी तालुक्यात गोदावरी नदीतून रोज वाळूचा उपसा होतो. वाल्मिक कराडच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत याप्रकरणात कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करतो की, जोपर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे. या प्रकरणाचा निःपक्षपणे तपास झाला पाहिजे. ही बीड जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. आजचा मोर्चा पहिले पाऊल आहे, जर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर यापेक्षा तीव्र भूमिका घेतली जाणार आहे.
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही धनंजय मुंडेंवर शरसंधान केले. ते म्हणाले की, अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झालेली नाही. आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या आका चा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे. मुंडेसाहेबांना मंत्रिमंडळात राहाण्याचा अधिकार नाही. धनंजय मुंडे तुम्हाला बीडला न्याय द्यायचा असेल, या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा. तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आम्हाला मारायला? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या. सीआयडी आणि एसआयटीकडे चौकशी दिलेली आहे. पण चौकशी करणारे अधिकारी कोण आहेत, हे कोणालाच माहिती नाही. वाल्मिक कराडवर हत्येचा 302 चा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या तरच न्याय होईल. राजकारण नको. नवीन वर्षांत 2 तारखेपर्यंत अटक झाली नाही, तर मी उपोषणाला बसणार आहे.
शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध आहे तरी त्याचे नाव नाही. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे संरक्षण असल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अजित पवार तुमची काम करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल, तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. तुम्हाला बीडचा बिहार करायचा आहे का ? ते त्यांचा राजीनामा घेतील की नाही माहीत नाही. पण बीडच्या जनतेला मला सांगायचे आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद दिले तर छत्रपती घराणे बीडचे पालकत्व घेणार आहे.
यावेळी माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, जमा केलेला 40 लाख रुपयांचा निधी देशमुख कुटुंबाला देणार असल्याची घोषणा केली. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यावेळी म्हणाली की, माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, त्यांची हत्या कशाप्रकारे झाली. ते समाजसेवक होते. त्यांनी समाजासाठी कार्य केले. शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एका दलित व्यक्तीची मदत करत होते. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहा आणि माझ्या कुटुंबासोबत राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून, हा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन लढू.
आरोपींची संपत्ती जप्त करा
मुख्यमंत्र्यांचे आदेश?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील फरार आरोपींची जप्त करण्याचे सक्त आदेश आज सीआयडीला दिले असे सांगितले जात आहे. मात्र वाल्मिक कराडना अटक करण्याबाबत त्यांनी आज वक्तव्य केले नाही. या हत्येप्रकरणाने बीड जिल्ह्यातील हजारो बंदूक परवान्यांचा विषयही चर्चेत आला. त्यामुळे जे कोणी बंदुकीसह फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात त्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी सीआयडीला दिल्या असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top