ढाका- सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीतील सुधारणांवरून विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन मागे घेतल्यानंतर बांगलादेशातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार काल दुपारी ३ वाजता मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आल्यानंतर सर्व वापरकर्त्यांना तीन दिवसांसाठी ५ जीबी इंटरनेट मोफत दिले जाईल, अशी घोषणा माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान राज्यमंत्री जुनैद अहमद पलक यांनी केली आहे.
१९७१ मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या युद्धवीरांच्या नातेवाईकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांत आरक्षण देण्याच्या निर्णयाला ढाका आणि इतर शहरांमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीविरोध केला होता. या आंदोलनाने पुढे हिंसक वळण घेतले होते. या हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. देशभरात उसळलेल्या हिंसाचारानंतर इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती.
दरम्यान, नागरी सेवेतील ९३ टक्के नोकऱ्या गुणवत्तेवर आधारित असतील तर उर्वरित २ टक्के जातीय अल्पसंख्याक, भिन्नलिंगी आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी राखीव असतील, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला.