मुंबई- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने बीडचे आमदार सुरेश धस यांचे आज आभार मानले. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचेही स्पष्ट केले. बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाविषयी बोलताना आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करताना प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. त्यावर तिने पत्रकार परिषद घेऊन जोरदार आक्षेप घेतला होता. महिला आयोगातही तक्रार केली. त्यानंतर सुरेश धस यांनी काल दिलगिरी व्यक्त केली.
प्राजक्ता माळीने व्हिडिओ संदेशाद्वारे या वादावर पडदा पाडला असून, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले की, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. सुरेश धस यांनी माझे नाव घेतले नसते तर मी पत्रकार परिषदही घेतली नसती. धस यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी एक संवेदनशील नागरिक म्हणून माझीही भूमिका आहे. आम्ही कलाकार केवळ ट्रोलिंगच्या भितीने अशा प्रकरणात समाजमाध्यमांवर व्यक्त होत नसतो. या एकूण प्रकरणी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. या प्रकरणी आपल्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तिने नागरिकांचे आभार मानले आहेत.
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचे नाव भरसभेत घेतल्याने ती अत्यंत खजिल झाली. तिने पत्रकार परिषद घेऊन धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. मात्र धस माफी मागायला तयार नव्हते. शेवटी तिने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी धस यांना बोलावून घेतले. त्यानंतर धस यांनी प्राजक्ता माळीची जाहीर माफी मागितली. आता तिने हा माफीनामा स्वीकारल्याने या विषयावर पडदा पडला आहे .