जयपूर- पुराणात अनेक दंतकथात उल्लेख असलेली सरस्वती नदी पृथ्वीवरून लुप्त झाल्याचे मानले जाते. ही नदी राजस्थानात पुन्हा अवतरल्याचा दावा केला जात आहे.
राजस्थानातील जैसलमेर वाळवंटात शनिवारी संध्याकाळी बोरिंग मारण्याचे काम सुरु होते. त्यावेळी जवळपास साडेआठशे मीटर बोरिंग मारल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह सुरु झाला.
जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला. काही क्षणात या परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले.हा प्रवाह एवढा मोठा होता की त्या प्रवाहात बोअरिंग मारणारा ट्रकही बुडाला.ही माहिती कळताच स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली.जमिनीतून बाहेर पडणारा पाण्याचा हा मोठा प्रवाह थांबवण्यासाठी ओएनजीसीची टीमही घटनास्थळी दाखल झाली. पण पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून तेही काही उपाय करू शकले नाहीत. त्यामुळे इथल्या पाचशे मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारी सुरु झालेला पाण्याचा प्रवाह तिसऱ्या दिवशी आपोआप बंद झाला. त्यामुळे हा लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा प्रवाह असल्याचे मानले जात आहे.