पुण्याच्या सदाशिव पेठेत भिंत हिरवी रंगवून पूजाअर्चा

पुणे- पुण्यातील सदाशिव पेठेत ज्ञान प्रबोधिनी शाळा परिसरातील एका छोट्या गल्लीतील भिंतीच्या कोपऱ्यावर हिरवा रंग लावून त्यावर हार-फुले वाहिली होती. याचा व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यावर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी तडक त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी हातात ब्रश घेऊन त्या हिरव्या रंगावर भगवा रंग दिला. तिथे गणपतीचा फोटोही ठेवला. याचा फोटो काढून तो पोस्ट केला. विशेष म्हणजे इथे हिरवा रंग लावून दर गुरुवारी पूजा करणारा सदाशिव पेठेतील हिंदू तरुण असल्याचे उघड झाले आहे.
एक्सवर खासदार कुलकर्णी यांनी लिहिले की, काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हॉट्सॲप व्हायरल झाले होते. मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शहानिशा केली. त्यानंतर हिरव्या रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहूया. सर्वांना एकच विनंती आहे की, आजूबाजूला काय घडते आहे याकडे एक सजग हिंदू म्हणून लक्ष देऊन कृती करूया.
त्या पुढे म्हणाल्या की, ज्या शाळेची ती भिंत आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. यासंदर्भात पोलिसांना कळवले आहे. परंतु हा अतिशय तथ्यहीन आणि तर्कहीन प्रकार असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कृती केली. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी त्याठिकाणी कधीही हिरवा रंग लावला नव्हता किंवा याचे प्रार्थनास्थळात रुपांतर करण्याचा प्रयत्न झाला नव्हता. संबंधित व्यक्तीचे नाव समजले असून आम्ही त्यासंदर्भात अधिक माहिती घेत आहोत.
हिरवा रंग देण्याच्या उद्देशाबद्दल त्या म्हणाल्या की, हा प्रश्न जे रंग देतात त्यांना विचारला पाहिजे. मात्र महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत अशा गोष्टी सुरू आहेत. हळूहळू अशा जागा बळकावल्या जात आहेत. लहान स्वरुपात सुरू झालेली कृतीचे रुपांतर होऊन या ठिकाणी मोठी प्रार्थनास्थळे होतात. देशात लोक अस्वस्थ आहेत. कारण ज्या ठिकाणी पिढ्यांपिढ्या शेती केली जाते त्या जागेवर वक्फच्या नावाने दावा केला जातो. यासंदर्भात आम्ही संयुक्त संसदीय समितीत संशोधन करत आहोत. कायदा येणार आहे. आता ठिकठिकाणी हिंदू जागृत होत आहे. नागरिकांना आवाहन आहे की, असे कुठे काही आढळल्यास वेळीच जागे व्हा. फुटपाथ, फ्लायओवर,रेल्वे लाईनच्या कडेने कोणते पीर असू शकतात? हे लोक पीर-मजारी, रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यात निनावी समाध्या आहेत असे सांगतात. अशा घटना वाढत आहेत. हिंदू धर्मात महात्मे समाधी घेतात तेव्हा त्यांचे नाव आणि कार्य माहीत असते. हे खोटे आहे आणि याचा नक्कीच बिमोड केला जाईल.
शाळेच्या भिंतीला रंग देणारा व्यक्ती हा सदाशिव पेठेतील हिंदू धर्मीय रहिवासी आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी पीर बाबा असल्याचे सांगून दर गुरुवारी पूजा करतो, अशी माहिती पोलिसांनी दिल्याची चर्चा आहे. याबाबत खासदार कुलकर्णी म्हणाल्या की, गुरुवारी पीर बाबाची पूजा होते का? गुरुवारी दत्ताची पूजा होते आणि हिंदूंचा वापर करण्याचे हे नवीन तंत्र असू शकते. कारण मलंग बाबा हे नाथपंथीय साधू होते. मात्र आता तेथे हाजी मलंग हे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ प्रस्थापित झाले आहे. यामध्ये हिंदूंनी सतर्क झाले पाहिजे. हिंदू कुठे भरकटत असेल तर आम्ही त्यांना जागृत करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top