परळीमध्ये नऊ अब्ज रूपयांचा केवळ एका व्यक्तीचा व्यवहार

बीड- महादेव बेटिंग ॲप घोटाळ्याचा उल्लेख करत परळीमधील एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. असा आरोप आज भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बीड घटनांच्या संदर्भात आमदार धस म्हणाले की, महादेव ॲप प्रकरणी एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे हे मलेशियापर्यंत आहेत. बीडमध्ये घडणाऱ्या घटनांमागे आका असतो. शिरसाळा परिसरात 1400 एकर गायरान जमिनीवर आकांच्या बगलबच्यांचा बेकायदेशीर ताबा घेऊन गाळे बांधले आहेत. त्याला कुणी हात लावू शकत नाही. ते बेकायदेशीर असून पाडले जात नाहीत.जवळच्या परिसरात देवीच्या मंदिरासाठी आठ एकर जागा होती. तिकडे आता जागा उरली नाही. आकाचा हा गँगस ऑफ वासेपूर पॅटर्न आहे की अन्य कोणता नवीन पॅटर्न आहे? बंजारा व पारधी समाजाची जमीन ताब्यात घेऊन त्याठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. नारायण राणे महसूल मंत्री होते तेव्हा आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्टकडून रस्त्याला लागून असलेली अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली होती. त्याठिकाणी रुग्णालय, वृद्धाश्रम बांधायचे होते. मात्र तेथे काहीही करून दिले जात नाही. आका यांना जर तेथे अध्यक्ष, सचिव केले तरच ट्रस्ट चालवू देऊ, अशी भूमिका आहे. जिल्ह्यात रोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत.आकांची शंभर एकर जमीन असल्याचे गावकरी सांगतात. वाळू माफिया, राख माफियांचे प्रमाण वाढले आहे. परळीत 600 वीटभट्ट्या आहेत, त्यापैकी 300 गायरान जमिनींवर आहे. त्यातून प्रचंड पैसा आकाने मिळवला आहे.
ते पुढे म्हणाले की, परळीत पॉलिटिक्सचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना येथे आणले जाते. जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि इथे शिकून ते याचा प्रसार देशभरात करावा. कारण जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर चित्रपट काढता येईल. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.
सरपंच हत्या प्रकरणी ते म्हणाले की, नवीन अधीक्षक कावत यांना विनंती केली की, या हत्या प्रकरणाचा लवकर छडा लावावा. सदर घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. स्थानिक पोलीस सहकार्य करत आहेत. लवकरच आका हाती येतील, अशी आशा बाळगतो. आका सध्या कुठे फिरतात त्याबद्दल मी अधीक्षकांना माहिती दिली.
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मुंडे म्हणतात ‘मला घेरण्याचा प्रयत्न होतो आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे तर व्हा. आमचे लेकरु गेले. त्याला न्याय द्यायचा आहे. तुम्हाला कोणी घेरले? उद्याच्या बीड मोर्चाबद्दल ते म्हणाले की, हा काही राजकीय विषय नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लीम लोक सहभागी होणार आहेत.
बीड जिल्ह्यात ज्ञानराधा, परळीची राजस्थानी मल्टिस्टेट, जिजाऊ माँसाहेब, माजलगावची एक बँक आहे, सर्व मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह बँकांनी जवळपास 10 हजार कोटी रुपये, शेतकऱ्यांची सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये बुडवले. ही घटना नाही. मात्र त्यांना डिफेन्डर नावाची गाडी गिफ्ट दिली की, तुमची संस्था खूप चांगली आहे. हे सगळे चालल्यामुळे काही ठिकाणी एसीबीची धाड पडली. तिथे एक-एक कोटी रुपये मिळाले. त्यांचा बचाव कोणी केला याचासुद्धा तपास झाला पाहिजे.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की मिटकरी लहान आहे. तू कोणाच्या नादी लागतो? या रगेलच्या नादी लागू नको. तुझे लय अवघड होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top