मुंबई – देशात मतदानयंत्राविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. देशातील जनतेची मागणी असूनही मतदानयंत्रे वापरण्याचा इतका अट्टाहास कशासाठी सुरू आहे? मोदी शहा यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन जिंकून दाखवावे, असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम विरोधातील याचिका दोन मिनिटांत निकाली काढली. आम्ही काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. न्यायालय म्हणते की पराभव झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येता. वास्तविक आम्ही गेल्या दहा वर्षांपासून ही लढाई लढत आहोत. निकाल सकारात्मक असो वा नसो, आम्ही कायम ईव्हीएमला विरोध केलेला आहे. देशातील जनतेचा एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल तर एवढा अट्टाहास का सुरु आहे?
यावेळी त्यांनी महायुतीचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शरसंधान केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आता मोदी व शहा यांचे लाडके राहिलेले नाहीत. त्यावेळी त्यांना शिवसेना फोडली म्हणून मुख्यमंत्रीपद दिले गेले होते. मेहेरबानीखातर त्यांना मुख्यमंत्री पद दिले होते. तेव्हाच त्यांनी गृहमंत्रीपद घ्यायला हवे होते. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. एकत्र राहण्यासाठी संवाद व संपर्क सुरू आहे.