ठाणे – ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ.मानसी प्रधान,कन्या,जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे.
काही दिवसांपासून प्रधान यांची तब्येत खालावली होती. त्यांना गेल्या आठवड्यात गोडबोले हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. खासदार राहिलेल्या सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोठे योगदान दिले. १९७४-८१ या कार्यकाळात ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान यांनी काम पाहिले.ठाणे शहरात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर १९८६-८७ या काळात त्यांनी ठाण्याचे पहिले महापौरपद भूषविले. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. यासोबतच शहरातील विविध क्रीडा संस्थांचे प्रमुख म्हणून प्रधान यांनी काम पाहिले. ठाण्यातील मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी त्यांनी १९८० साली ज्ञानसाधना महाविद्यालय स्थापन केले. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली.