मुंबई – चेंबूरमधील माहुल ग्राम समिती व माहुल ग्राम हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्शी १८ वा ‘माहुल फेस्टिव्हल कोळी महोत्सव’ गुरुवार ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.हा कोळी महोत्सव रविवार ९ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे सलग चार दिवस चालणार आहे.
माहुल गावातील माहुलकर मनोरंजन मैदानात सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाची सुरूवात ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री एकविरा आई देवी पालखी मिरवणूकी होणार आहे.या महोत्सवात अनेक सिने अभिनेते तसेच राजकीय नेते मंडळी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या महोत्सवातून मुंबईतील आद्य रहिवाशी असलेल्या कोळी समाजाची सांस्कृतिक प्रथा जपून आर्थिक विकासाची संधी निर्माण करण्याचा तसेच फ्लेमिंगो पक्ष्याचा प्रचार व प्रसार करण्याचा संस्थेचा उद्देश आहे,असे समितीचे अध्यक्ष राजेंद्र माहुलकर यांनी सांगितले.या महोत्सवात सांस्कृतिक, पारंपरिक नृत्य,नाट्य या कार्यक्रमांबरोबरच कोळी समाजातील चविष्ट आणि चमचमीत मटण,म्हावरा म्हणजेच मासे आणि तांदळाची भाकरी अशा खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे.हा कोळी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीचे सेक्रेटरी आशिष चव्हाण, जगन्नाथ पाटिल तसेच गणेश वैती,विनोद नायर, यशवंत माहुलकर,शंकर कोळी,संजय राठोड, कमलाकर कोळी,सन्नी ठाकुर हे पदाधिकारी,सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.