वॉशिंग्टन- अमेरिकन कंपन्यांचे प्रभुत्व असलेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय-आर्टिफिशियल इंटेलिजन्स) क्षेत्रात चीनच्या एका स्टार्टअप कंपनीने ‘डीपसीक’ नावाचे नवे एआय मॉडेल आणून जगभर खळबळ उडवून दिली आहे. विशेषतः अमेरिकेची झोप उडवली आहे. हे मॉडेल अमेरिकन कंपन्यांच्या चॅटबॉटच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा ते कितीतरी अधिक पटीने कार्यक्षम आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघण्याची भीती आहे. हे चिनी तंत्रज्ञान बाजारात आले आणि अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले. आपण जगातील महासत्ता आहोत याचा माज असलेल्या अमेरिकेला चीनच्या एका स्टार्टअप कंपनीने जोरदार थप्पड लगावली .
अमेरिकेने चीनची कृत्रिम बुद्धिमत्तेतील भरारी रोखण्याचा प्रयत्न केला. यासाठी लागणारी चिप चीनला विकायची नाही, असा निर्बंध घातला. पण त्याचा उपयोग झाला नाही. चिनी कृत्रिम बुद्धी येताच अमेरिकेची चिपनिर्मिती कंपनी एनव्हिडिया कॉर्पचे शेअर धडाधड कोसळले. त्यामुळे 593 अब्ज डॉलर बाजार भांडवलाचा काही मिनिटांत चुराडा झाला. जगभरच्या शेअर बाजारातही अशीच पडझड झाली. डीपसीकच्या यशाकडे राजकीय दृष्टिकोनातनही पाहिले जात असून यामुळे अमेरिका – चीनमधील वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होणार आहे.
एआयच्या क्षेत्रात ओपनएआय, गुगल, मेटा या अमेरिकन कंपन्यांचा जगभर बोलबाला आहे. अमेरिकन सरकारच्या पाठबळावर या कंपन्यांनी जगभर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, चीनमधील हांगझोऊ येथील डीपसीक नावाच्या रिसर्च लॅबने याच नावाचे चॅटबॉट विकसित केले. या चॅटबॉटचे वैशिष्ट्य असे की, प्रमुख ए.आय. कंपन्या वापरतात त्या विशेष संगणक चिप्सच्या तुलनेत खूपच कमी संख्येने चिप्स वापरून या चॅटबॉटची निर्मिती झाली आहे. एनव्हिडिया कंपनीच्या चिपच्या तुलनेतील कमी क्षमतेच्या एच -800 चिपचा वापर यात करण्यात आला आहे. इतर कंपन्यांच्या एआय चॅटबॉटमध्ये एनव्हीडियाच्या 16,000 चिप असतात. तर डीपसीकमध्ये फक्त 2,000 चिपचा वापर केला जातो. त्यामुळे डीपसीकसाठी 60 लाख डॉलरपेक्षा कमी निर्मिती खर्च आहे. ओपनएआय, गुगल, मेटा यांनी त्यांच्या एआय मॉडेलवर जो खर्च केला आहे त्या तुलनेत चीनचा हा खर्च किरकोळ आहे.
डीपसीकच्या मुसंडीमुळे जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाला मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे कंपनीचे 593 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. एनव्हीडिया कॉर्पच्या बाजार भांडवलात एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होती. सप्टेंबरमध्ये 2024 मध्ये 9 टक्के घसरण होऊन कंपनीला सुमारे 27 अब्ज डॉलरचा तोटा झाला . दुसरा मोठा फटका चिपनिर्मिती कंपनी ब्रॉडकॉम इंकलाही बसला. या कंपनीचे शेअर 17.4 टक्क्यांनी घसरले. तर मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 2.1 टक्के घसरण झाली. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे शेअर 4.2 टक्क्यांनी घसरले. या घसरणीचा फटका नॅस्डॅक निर्देशांकालाही बसला. हा निर्देशांक 3 टक्क्यांनी खाली आला. हा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिला नाही, तर युरोपियन आणि जपानी बाजारांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला. त्यामुळे मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मोठी घट होऊन एका दिवसात सुमारे 10 लाख कोटी बाजार मूल्याचे नुकसान झाले.
डीपसीक हे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिकेकडून चीनवर लादण्यात येणार्या निर्बंधांच्या विरोधात त्याचा वापर होऊ शकतो. 20 जानेवारी रोजी हे मॉडेल लाँच झाले, तेव्हा या कंपनीचे संचालक लिआंग आणि चिनी पंतप्रधान ली किआंग यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे भविष्यात चीनी डीपसीकचे यश धोरणात्मक उद्दिष्टासाठी वापरले जाऊ शकते . अमेरिकन तज्ज्ञांनी आताच डीपसीकवरून धोक्याचा इशारा दिला आहे.
डीपसीक काय आहे?
डीपसीक तंत्रज्ञान म्हणजे सोप्या शब्दांत चॅटजीपीटीचा चिनी पर्याय आहे. डीपसीकचे संस्थापक लिआंग वेंगफेंग हे शेअर मार्केटसाठी फायनान्सच्या डेटाचे एआयच्या सहाय्याने विश्लेषण करणारे अभियंते होते. एआयमधली ॲपचा अभ्यास हा त्यांचा छंद होता. आपणही अशी ॲप्स विकसित करुन पाहू, असे म्हणून त्यासाठी लागणार्या एनव्हिडियाच्या चिप्स त्यांनी 2022 मध्ये विकत घ्यायला सुरुवात केली. लिआंगने 2023 मध्ये डीपसीक ही कंपनी तरुण पदवीधर मुलांना घेऊन सुरु केली. त्यानंतर 20 जानेवारी 2024 रोजी डीपसीक नावाचे एआय ॲप बाजारात आणले. ॲपलच्या ॲप स्टोअरवर डीपसीकचे मोबाईल ॲप मोफत डाऊनलोड करता येते. चॅटजीपीटीप्रमाणेच विचारलेल्या बाबींवर हे तंत्रज्ञान हवी ती माहिती पुरवते. डीपसीक ओपन सोर्स आहे. म्हणजे कम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या क्षेत्रात ओपन सोर्समध्ये एखाद्या ॲपचे कोड डेव्हलपर्सना फ्री असते. ते कोड जगभरातील कोणतेही डेव्हलपर्स वापरुन ते त्यांना हवी ती ॲप त्यावर बनवतात. डीपसीकचे मॉडेल ओपन आयच्या मॉडेलपेक्षा वापराच्या बाबतीत 20 ते 50 पट स्वस्त आहे, असे डीपसीकच्या अधिकृत वुईचॅट अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, ते स्वस्त असले तरी त्याची कामगिरी ओपन आयच्या चॅट जीपीटी, गूगलच्या बार्डच्या बार्ड यांच्याइतकीच किंबहुना त्यांच्यापेक्षा सरस आहे. शिवाय ते मोफत आहे. त्यामुळे 20 जानेवारीला हे चॅटबॉट लाँच झाल्यावर अल्पावधीतच ते जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले आहे. त्याला इतका प्रतिसाद मिळाला की, त्याला काही काळ आउटेजचा सामान करावा लागला. त्यामुळे ते काही काळ बंद ठेवावे लागले होते.