मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी करण्याच्या उद्देशाने आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा दावा भिंडेने केला. या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. भिंडे याने याप्रकरणातील अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मात्र, त्याची अटक कायदेशीर ठरवून त्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर, भिंडे याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात त्याला जामीन मंजूर केला होता. भिंडे याने आता आपण निर्दोष असल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथाडे यांनी भिंडे याच्या अर्जावर पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान, कंपनीच्या स्थापनेपासून ते दुर्घटनाग्रस्त महाकाय फलक लावले जाईपर्यंत आपण कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंधित नव्हतो. याउलट, सध्या जामिनावर असलेल्या प्रकरणातील सहआरोपी जान्हवी मराठे या कंपनीच्या संचालकपदी कार्यरत होत्या. त्यामुळे, आरोप अस्पष्ट आणि संदिग्ध असून गुन्ह्यातील आपल्या सहभागाबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा भिंडे याने केला आहे.