तिरुअनंतपुरम – केरळच्या काँग्रेस आमदार उमा थॉमस एका कार्यक्रमादरम्यान त्या पंधरा फूट उंच व्हिआयपी गॅलरीतून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे,अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
रविवारी कोची येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मृदुंग नादम या भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केरळचे सांस्कृतिक कार्यमंत्री साईजी चेरियन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उमा थॉमस कार्यक्रममासाठी विशेष निमंत्रित होत्या. व्हिआयपी गॅलरीतील पहिल्या रांगेतील आपल्या आसनाकडे चालल्या असता त्यांचा तोल गेला पंधरा फुटावरून खाली पडल्या. या अपघातात त्यांचे डोके, पाठीचा मणका आणि फुफ्फुसाला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उमा थॉमस केरळच्या त्रिक्काकारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.