जुन्नर – मागील २० दिवसांत चारवेळा नागरिकांवर हल्ला करणार्या बिबट्याला अखेर पिंजर्यात जेरबंद करण्यात यश आले आहे.तालुक्यातील ओतूर येथील बाबीत मळ्यामध्ये वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजर्यात हा बिबट्या अडकल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी दिली.
काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच लहु ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या पथकाने या बिबट्याला पिंजर्यासह ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे सुखरूप दाखल केले. जेरबंद झालेला बिबट्या मादी असून तो अंदाजे सहा ते सात वर्षे वयाचा आहे. ओतूर,कपर्दीकेश्वर, बाबीत मळा,पाथरटवाडी,रहाटी या परिसरातील मार्गावर गेल्या १५ ते २० दिवसांत तीन ते चार वेळा नागरिकांवर या बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी वनविभाग कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे बाबीत मळा येथे वनविभागाने पिंजरा लावला होता.