पुणे- दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आटायला सुरुवात झाली आहे. तलाव कोरडा पडत चालला आहे, त्यामुळे तलावावर अवलंबून असणाऱ्या १२ गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे या तलावात नवीन मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
व्हिक्टोरिया तलावातील पाणीटंचाईमुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन बारामतीच्या जिरायती भागाला याचा जोरदार फटका बसणार आहे. हा तलाव दौंड आणि बारामती तालुक्यातील काही गावांसाठी वरदान समजला जातो. दौंड आणि बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जानाई- शिरसाई उपसा सिंचन योजना या व्हिक्टोरिया तलावावर अवलंबून आहेत.
दौंड तालुक्यातील खोर,पाटस, वरवंड, कुसेगाव, देऊळगाव गाडा, पडवी, कानगाव, कडेठाण या गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहेत. या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक गावाना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. पाणीसाठा संपल्यास याचा फटका शेती, अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व अनेक कंपन्यांना बसणार आहे. त्यामुळे या तलावात जादा पाणी सोडावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव कोरडा पडू लागला
