मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर झाला आहे.
मुंबईच्या दिशेने जात असणाऱ्या मार्गिकेवर खालापूरजवळच्या माडप बोगद्यामध्ये एका खासगी बसने समोर चालत असलेल्या पीकअप व्हॅनला धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, पीक अप व्हॅन बोगद्याच्या भिंतीला धडकली. या अपघात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. बचाव पथकांमधील प्रशिक्षित जवानांनी संपूर्ण काळजी घेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्यावरुन बाजूला काढली. यावेळी वाहनांमधून इंधन गळती होणार नाही किंवा इतर समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली होती. अपघातग्रस्त वाहने बोगद्यामधील मार्गिकेमधून बाहेर काढल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.