तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात जबाब नोंदविण्यासाठी मागितलेली मुदतवाढ देण्यास न्यायालयाने ठाम नकार दिला. त्यामुळे नेतन्याहू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेतन्याहू यांनी हमास आणि लेबनॉनविरुध्द छेडलेल्या युध्दावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. नेतन्याहू यांना पदावरून हटविण्याची मोहीम विरोधकांनी सुरू केली आहे.या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांना आपल्याविरूध्द सुरू असलेला भ्रष्टाचाराचा खटला लांबणीवर टाकायचा होता. मात्र न्यायालयाने स्पष्ट शब्दात नेतन्याहू यांना खडे बोल सुनावले. हा खटला आधीच चार वर्षांहून अधिक काळ लांबला असून पंतप्रधानांनी २ डिसेंबर रोजी आपली भूमिका मांडलीच पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले.
पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी तीन खटले एकाचवेळी सुरू आहेत. हे तिन्ही खटले जरी वेगवेगळे असले तरी त्यामध्ये केलेले आरोप हे एकमेकाशी संबंधित आहेत. त्यामुळे जेरुसलेम जिल्हा न्यायालयात या तीन खटल्यांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. २०२० पासून ही सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत न्यायालयाने ३०० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.