पुणे -आरटीई अर्थात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी १० फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. त्यानंतर आता प्रवेशाची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडतीतील निवड झालेल्या बालकांच्या पालकांची कागदपत्रे पडताळणीसाठी तालुका व वॉर्ड स्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिले जातील. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल. पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, अशी नोंद करण्यात येईल. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आरटीई पोर्टलवर सुविधा करण्यात येईल.