आदित्य ठाकरेंवर कमरेखाली वार! डान्सबारचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर प्रथमच कमरेखाली वार करून टार्गेट करण्यात आले. त्यांची मालकी असलेल्या बारमधून बारबाला बाहेर पडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. यामुळे ठाकरे गट संतप्त आहे. याआधी दिशा सालियान प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. पण आजचा बदनामीचा प्रयत्न हा हद्द ओलांडणारा होता. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर यापेक्षा नीच पातळीवर आरोप-प्रत्यारोप होतील हे आता स्पष्ट झाले आहे.
आदित्य ठाकरे यांची बदनामी करणारा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका डान्स बारचा आहे. हा बार उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या मालकीचा असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे ठाकरे गट संतापला असून, या विरोधात त्यांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
सोशल मीडियावर फिरणार्‍या या व्हिडिओत बारच्या छुप्या तळघरातून बारबाला बाहेर पडताना दिसत आहेत. यात थेट आदित्य यांचे नाव नसले तरी हा बार उद्धव ठाकरे यांच्या मुलाचा असून, तो अंधेरीत असल्याचे म्हटले आहे. समुद्रमंथनात जितकी रत्ने बाहेर पडली नाहीत, तेवढी रत्ने या बारमधून बाहेर निघाली आहेत, असा मजकूर या व्हिडिओसोबत आहे.
या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या दाव्यात तथ्य नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सायबर पोलिसांना पत्र दिले. काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून हा व्हिडिओ जाणूनबुजून व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, असे पत्रात नमूद केले आहे. विनायक राऊत याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा बार आदित्य ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात आहे. विकृत मनोवृत्तीचे सत्ताधीश राजकारणी यामागे आहेत. त्यांची टोळी कार्यरत असून, आम्ही सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांनीदेखील सहकार्य केले आहे. सत्ताधार्‍यांचा आयटी सेल आदित्य ठाकरेंच्या बदनामीचे काम करत आहे, असा आमचा
आरोप आहे. पोलिसांनाही त्याच्याबद्दल माहिती असल्यामुळे ते योग्य चौकशी करतील. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा दावा केला जात असलेला हा बार अंधेरी येथील दीपा बार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिसांनी 13 डिसेंबर 2021 रोजी या बारवर छापा टाकून बारमधील छुप्या तळमजल्यातून 17 महिलांची सुटका केली होती. त्यासंदर्भातील बातम्याही त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या कारवाईचा व्हिडिओ आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी शेअर केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top