अहमदनगरमध्ये बिबट्यांनी पिंजऱ्यातून बिछड्याला सोडवले

अहमदनगर – विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका केल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. अहमदनगरमध्ये चक्क बिबट्यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या बछड्यांची सुखरुप सुटका केली आहे. या ‘रेस्क्यु ऑपरेशन’चा थरार गावकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील चितळी गावात एका महिन्यापूर्वी एका लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. हल्लेखोर बिबटा वनविभागाच्या हाती लागला नव्हता. त्यावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर वन विभागाने चितळी गावात परवा पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अडकला होता. त्या बछड्याच्या आवाजाने रात्री त्याची आई व आणखी एक बिबट्या पिंजऱ्याजवळ आले. त्यांनी धडका देऊन हा पिंजरा खाली पाडला. या पिंजऱ्याच्या आधीच कुजलेल्या प्लायवुडच्या फळ्या त्यांनी दातांनी तोडल्या. त्यामुळे बछडा पिंजऱ्याच्या बाहेर येऊ शकला. बछड्याला घेऊन ते निघून गेले. रात्रभर चाललेला हा प्रकार सकाळी साडेसात वाजेपर्यंत चालला. गावकरी हा सारा प्रकार पाहात होते. मात्र कोणाचीही पुढे जायची हिंमत झाली नाही. आता बछड्याची सुटका झाली म्हणून आनंद व्यक्त करायचा की बिबटया मोकाट फिरताहेत म्हणून चिंता करायची अशा विचारात चितळी ग्रामस्थ आहेत. अशा प्रकारच्या कमकुवत पिंजऱ्यांनी काय बिबटे पकडणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top