मुंबई- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे केलेली हत्या. ही हत्या व खंडणी आरोपांबद्दल वाल्मिक कराडवर आरोप, वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडेंशी असलेले जवळचे संबंध या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा ही मागणी दिवसेंदिवस जोर धरत असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष केल्यासारखे वागत होते. परंतु शेवटी दबाव फार वाढल्याने धनंजय मुंडेंबाबत निर्णय घ्यावाच लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दिल्लीला रवाना होत आहे. याचा अर्थ येत्या काही दिवसांतच धनंजय मुंडेंवर गाज पडणार आहे.
आज मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना सवाल केले असता धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्यावर जे आरोप झाले आहेेत त्याबाबत मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री उत्तर देतील. त्यांनी उत्तर द्यावे, अशी माझी इच्छा आहे. कृष्णा आंधळे सापडणार नाही असे क्षीरसागर म्हणतात. तो कुठे आहे ते माहीत नाही, पण त्याच्याबद्दल क्षीरसागर यांना माहीत आहे याचा अर्थ त्यांचा आंधळेंशी संबंध आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन आरोप केला की, मुंडे हे मंत्री असूनही त्यांच्या कंपनीला सरकारी कंत्राटे मिळत आहेत. हे बेकायदा आहे. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, औष्णिक ऊर्जा कंपनीत निर्माण होणारी राख विकण्याचे आमचे कंत्राट आहे. ही महानिर्मिती कंपनी आहे. या कंपनीचा सरकारशी काहीही संबंध नाही.
धनंजय मुंडे हे आज पत्रकारांशी बोलताना सहजपणे बोलण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. उद्या ते दिल्लीला जाऊन अमित शहा यांची गुप्त भेट घेतील आणि या भेटीत मुंडेंबाबत अंतिम निर्णय होईल. मात्र जनतेची दिशाभूल करण्यासाठी सांगितले जात आहे की, केंद्रिय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंडे दिल्लीला जाणार आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे राज्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.
दरम्यान भाजपा मंत्री सुरेश धस यांनी आजही या सर्व प्रकरणी नवे आरोप केले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. फडणवीस यांच्याशी त्याचा संबंध नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हणाले की, काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही कागदपत्रे दिली. मी ती कागदपत्रे वाचली आहेत. या प्रकरणात एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरु आहे. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ती कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. त्यातून जी वस्तुस्थिती बाहेर येईल त्यानंतर पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवले जाणार आहे. कोणाचा संबंधच नसेल तर त्याच्यावर कारवाईचा प्रश्न येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठी घालणार नाही.दोषींना फाशीची शिक्षा होईल, आणखी कोणाचे नाव आली तर त्याच्या वरही कारवाई केली जाईल. ही माझी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. आमदार सुरेश धस यांना काय वाटते याचे मला काही देणे-घेणे नाही. वेगवेगळ्या पक्षाचे खालचे कार्यकर्ते काय बोलतात त्याला मी उत्तर देण्यास बांधिल नाही. आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे. कोणीही आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये.
अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावर
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी 30 जानेवारीला बीड दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिला दौरा आहे. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांतील प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक विभागाची प्रलंबित योजना, त्यातील अडचणी आणि प्रगतीवर चर्चा केली जाईल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि त्यावर होणाऱ्या राजकीय चर्चांमुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.