बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज झाली. यावेळी सरकारने नेमलेले विशेष वकील उज्ज्वल निकम हेच प्रकृतीच्या कारणामुळे गैरहजर राहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे.
आज पहिली सुनावणी केज सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीसाठी नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रकृतीच्या कारणामुळे गैरहजर होते. त्यामुळे सरकारी पक्षाकडून ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराडच्या वतीने कोल्हापूरचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी ॲड.अशोक कवडे हे कराडचे वकील होते. आता खाडे हे वकील आहेत.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या सुनावणीला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर केले होते. संतोष देशमुख यांचे अपहरण झाले तेव्हा शिवराज देशमुख त्यांच्यासोबत होते. त्यांनीच या प्रकरणाची फिर्याद नोंदवली होती. त्यामुळे फिर्यादी म्हणून ते न्यायालयात हजर होते. आवादा कंपनीचे प्रतिनिधी शिवाजी थोपटे मात्र गैरहजर होते.
न्यायालयात बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, आरोपपत्रात नमूद सीडीआरचे डिजिटल पुरावे,164 साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींचे मकोका अंतर्गत नोंदवलेले जबाब आरोपी पक्षाला मिळालेले नाही. यावर सरकारी वकील म्हणाले की, सुनावणीच्या पुढच्या तारखेला सरकारी पक्षाकडून जे द्यायचे आहे ते आणि आमचे म्हणणे न्यायालयात मांडू. त्यासाठी 26 मार्चची तारीख द्यावी.
सुनावणीनंतर कराडचे वकील विकास खाडे म्हणाले की, न्यायालयात याप्रकरणाचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये असलेली अनेक कागदपत्रे आरोपींना मिळणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात आम्ही आज मागणी केली असून ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळणार आहे.
सरपंच देशमुख हत्याप्रकरण! पहिल्या सुनावणीत वकील गैरहजर
