मुंबई- कोकणाजवळील अरबी समुद्रात नवे तेलसाठे सापडले आहेत.कोकण पट्ट्यातील पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये हे तेलसाठे सापडले आहेत.यामुळे देश तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे याठिकाणी उत्खनन करणार आहेत.
हे तेलसाठे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ व सिंधुदुर्गातील मालवणजवळ समुद्रात आहेत.डहाणूच्या समुद्रात ५,३३८.०३ आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात १८ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत.या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे तळकोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे.तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे.यापूर्वी १९७४ मध्ये मुंबईच्या समुद्रात जवळपास ७५ सागरी मैल अंतरावर खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. मुंबईची ही तेल खाण बॉम्बे हाय नावाने ओळखली जाते. या ठिकाणावरून अद्यापही मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. यानंतर २०१७ मध्ये तेलसाठे सापडले होते. येथे अमृत’ आणि ‘मुंगा’ या दोन तेल विहिरी खोदण्यात आल्या. आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेले तेलसाठे मोठे आहेत. यामुळे तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे.