मुंबई- मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोड परिसरात पालिकेने खास महिलांसाठी ‘जिम-ऑन-व्हील्स’ म्हणजेच चालती फिरती जिम सुरू केली आहे. ही जिम बस गुलाबी रंगाची असून तिचा वापर फक्त महिलांच करू शकतील. डीपीसी आणि बी द चेंज फाउंडेशनच्या सहकार्याने ही जिम बस सुरू करण्यात आली आहे.
ही चमकदार गुलाबी बस गृहिणी आणि वृद्ध महिलांना काही अटींवर व्यायामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या २८० महिला या जिम बसचा लाभ घेत आहेत. यासाठी पालिकेने ३ कोटी रूपयांची विशेष तरतूद केली आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार करण्याची पालिकेची कल्पना आहे. या जिममध्ये ट्रेडमिल, लॅट पुलडाऊन, लेग एक्सटेंशन, योगा बॉल, बॅटल रोप आणि डंबेलसह विविध फिटनेस उपकरणे आहेत ज्यांचे वजन १ ते १० किलोपर्यंत आहे. वापरणाऱ्यांमध्ये पोलिस भरती आणि धावण्याची तयारी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे,परंतु बहुतेक गृहिणी आहेत, ज्यांपैकी अनेकजणी यापूर्वी कधीही जिममध्ये गेलेल्या नाहीत. त्यापैकी एक उल्लेखनीय सदस्य म्हणजे ७५ वर्षीय कलावती सूर्यराव आहे. ही आजीबाई वांद्रे येथे घरकाम करते.