प्रयागराज – महाकुंभाच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सध्या प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला असून प्रयागराज रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे काल रात्री प्रयागराज रेल्वे स्थानक काही काळासाठी बंद करावे लागले.महाकुंभाची सांगता येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. त्याआधी महाकुंभातील स्नान करण्यासाठी देशाच्या विविध भागातून सध्या भाविकांचे लोंढे प्रयागराजला येत आहेत. प्रयागराज स्थानकावर काल रात्री येणाऱ्या व स्नान आटोपून जाणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी झाली. या गर्दीत दिल्लीप्रमाणे कोणतीही चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून अखेर प्रयागराज रेल्वेस्थानकावरील प्रवेश बंद करण्यात आला. काल रात्री दहा वाजल्यापासून स्थानकावर मोठी गर्दी झाल्याने अखेर रेल्वेने स्थानकांवरील प्रवेश बंद केला. त्यानंतर स्थानकाबाहेर लोकांनी एकच गोंधळ घातला. विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवाशांना रवाना केल्यानंतर स्थानकावरील प्रवेश सुरु करण्यात आला. रेल्वे व पोलिसांनी मिळून काही प्रवाशांना खुसरो बाग रेल्वे स्थानकावर पाठवले. तिथुनही प्रवाशांना बाहेर येऊ दिले नाही. प्रयागराजवरुन पाच रेल्वे गाड्या रवाना केल्यानंतर ही गर्दी आटोक्यात आली. यावेळी पंडित दिन दयाल उपाध्याय, कानपूर व माणिकपूरच्या दिशेने रेल्वे रवाना करण्यात आल्या.
प्रचंड गर्दीमुळे प्रयागराज रेल्वेस्थानकही बंद करावे लागले
