आठ देशांना भेट देऊन नौदलाची ‘तुशील’नौका कारवारमध्ये दाखल

वास्को – गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथून निघालेले भारतीय नौदलाचे ‘तुशील’ हे युद्धजहाज साडेबारा हजार सागरी मैलांचा प्रवास करून तसेच ३ खंडांतील ८ देशांना भेट देऊन दोन दिवसांपूर्वी कारवार येथे पोहचले. तुशील हे भारतीय नौदलाचे तलवार श्रेणीचे सातवे जहाज आहे.

कारवार येथे आगमन झाल्यावर जहाजाचे औपचारिक स्वागत करण्यात आले.कारवार यार्डचे अ‍ॅडमिरल अधीक्षक रिअर अ‍ॅडमिरल अजय पटनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात कर्नाटक नौदल क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांचा सहभाग होता.सात महिन्यांहून अधिक काळानंतर हे जहाजावरील कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना भेटले.युरोप आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याभोवतीच्या त्यांच्या पहिल्या प्रवासाचा भाग म्हणून जहाजाने लंडन (युनायटेड किंग्डम), कॅसाब्लांका(मोरोक्को), डाकार(सेनेगल), लोम (टोगो),लागोस (नायजेरिया),वॉल्विस बे (नामिबिया),डर्बन (दक्षिण आफ्रिका) आणि व्हिक्टोरिया (सेशेल्स) या बंदरांना भेट देऊन आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले.तुशीलने मोरोक्को, सेनेगल,नायजेरिया, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांसोबत सागरी भागीदारी सराव केला.जहाजाने गिनीच्या आखातात तिच्या प्रवासादरम्यान गस्त घालण्याचे काम देखील केले.प्रादेशिक सागरी सुरक्षेत भागीदारी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top