नवी दिल्ली- दिल्लीसह उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये आज भूकंपाचे धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ०.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्ली-एनसीआरमध्येच होता. भूकंपाचा केंद्र ५ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांनी घराबाहेर पळापळ केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजता बिहारमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याचे केंद्र सिवान जिल्ह्यात १० किलोमीटर खोलीवर होते. ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी होती. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, सहारनपूर, मथुरा, आग्रा, तसेच हरियाणातील कुरुक्षेत्र, हिसार, कैथल याठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ०.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपांच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत नागरिकांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आणि प्रशासनाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.