स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी! भाजपावर शिंदे, अजित पवार गट नाराज

मुंबई- विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून न लढता स्वबळावर लढवण्याचा भाजपाचा विचार आहे. भाजपाच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येईल. पण 2029 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाचे स्वबळावर सरकार आणू अशी घोषणा केली होती. ही घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच अंमलात आणण्याची भाजपाची रणनीती आहे. मात्र, त्यावरून महायुतीत वादाची नवी ठिणगी पडली असून, भाजपाने स्वतंत्र निवडणुका लढवल्यास आम्हीही स्वतंत्रपणे विरोधात लढू, अशी प्रतिक्रिया शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळूनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये अनेक कुरबुरी, वाद सुरू आहेत. आधी मुख्यमंत्रिपद, मग खातेवाटप आणि नंतर पालकमंत्रिपदासह लहानसहान कारणावरून नाराजीनाट्य रंगत आहेत. भाजपाला इच्छा नसूनही शिंदे आणि अजित पवार गटाच्या अनेक मागण्या मान्य कराव्या लागत आहेत. त्यामुळे भाजपात घटक पक्षांबाबत तीव्र नाराजी असून, युती नसली तरी हरकत नाही, असा विचार भाजपात बळावत आहे. त्यातून आगामी निवडणुका स्वबळावरच लढवण्यात याव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती लक्षात घेऊन भाजपाने आगामी महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका सुरू आहेत. या बैठकांत निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुका भाजपा स्वतंत्र लढणार, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे मत व्यक्त केले होते. भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले. त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, काही नेते उगाच आपली मते मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचे ते आपल्या नेत्याला सांगा. आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे काही म्हणणे असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल. आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे. आपण एकत्र लढायचे की, स्वबळावर लढायचे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये. महायुतीमध्ये लढायचे असेल तर हो म्हणा. एकत्र लढायचे नसेल तर आम्हीही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत.
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महायुती म्हणूनच लढायचे, असे आमचे धोरण आहे. भाजपा स्वबळावर लढेल असे वाटत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना जोश वाटावा म्हणून असे सांगावे लागते. पण स्थानिक पातळीवर काही लोकांना ते स्वबळावर लढणार आहेत असे वाटत असेल, तर आम्हीदेखील स्वबळाची तयारी ठेवू.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र लढवायच्या याचा निर्णय घेऊ. पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात आमचा महायुतीचा संकल्प आहे. परंतु एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर काही निर्णय झाला तर जिंकण्यासाठी तोही मान्य केला जाईल. बहुमत मिळावे यासाठी आम्ही महायुती म्हणून लढू आणि एखाद्या ठिकाणी निर्णय झाला नाही, तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. परंतु कुठल्याही परिस्थितीत महायुतीत पाडापाडी करणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top