नवी दिल्ली – महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यख मल्लिकार्जून खर्गे यांनी सपकाळ यांच्या नावाची घोषणा केली.कोल्हापूरातील काँग्रेस नेते सतेज पाटील, सांगलीचे विश्वजीत कदम यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पण अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देऊन काँगेस कडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला पसंती मिळाली. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सपकाळ हे विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नाना पटोले यांनी पक्ष नेतृत्वाकडे पदमुक्त करण्याची विनंती केली होती. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्षपदी नव्या आणि तरुण चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.त्यानंतर आज सकपाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली .
शेतकरी कुटूंबातून आलेले सपकाळ यांची गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बीपीएड पदवी घेतली आहे. सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात ते पहिल्यापासून कार्यरत होते. महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ते राजकीय जीवनात ते सक्रिय झाले होते. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले आहे.