मुंबई- दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते काल महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यामुळे ठाकरे गट संतप्त आहे. गद्दारांचे इतके कौतुक कशाला केले असा सवाल ठाकरे गटाने पवारांना विचारला. ठाकरे गट संतप्त असतानाच आज एकनाथ शिंदे यांचे दोन शिलेदार उदय सामंत आणि नरेश म्हस्के आज शरद पवारांना जाऊन भेटले. या भेटीनंतर शरद पवार काही बोलले नाहीत आणि शिंदेंचे दोन्ही आमदार काही सांगायला तयार नाहीत. त्यामुळे संशय अधिकच दाटला आहे .
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर उधळलेल्या स्तुतिसुमनांची आज दिवसभर चर्चा सुरू होती. यामुळे शिवसेना ठाकरे गटात संतापाची लाट उसळली. गद्दारांचे कौतुक कशाला? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित करत पवारांवर जळजळीत टीका केली. शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन करत प्रत्युत्तर दिले. या प्रकरणाने एकूणच शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटात यांच्या संबंधात मिठाचा खडा पडला आहे.
पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावर आणि वारेमाप कौतुकावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली. या सत्कार सोहळ्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी टाळायला हवा होता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी या विषयावर जाहीरपणे भूमिका मांडली नाही. परंतु ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांची अधिकृत भूमिका मांडली. पवार यांनी शिंदे यांचे कौतुक करताना केलेल्या प्रत्येक वक्तव्याचा प्रतिवाद संजय राऊत यांनी केला.
शिंदे यांचा उल्लेख ‘शिवसेना फोडणारा’, ‘महाराष्ट्राला अमित शहा यांच्या दावणीला बांधणारा’ असा करत ते म्हणाले की, शिवसेना फोडणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या शिंदे यांच्या सारख्यांचा सत्कार करणे पवारांना शोभणारे नाही. शिवसेना कमजोर करून महाराष्ट्राला कंगाल करणे हे मोदी-शहा यांचे राक्षसी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे यांनी मदत केली. त्यामुळे पवारांनी जरी शिंदेंचा सत्कार केला असला, तरी तो खरे तर शहा यांचाच सत्कार आहे. शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता अमित शहा यांच्याकडे गहाण टाकली. महाराष्ट्र कमजोर केला. अशा माणसाचा शरद पवारांसारख्या धुरंधर राजकारण्याच्या हस्ते सत्कार पाहताना मराठी माणसाच्या ह्रदयात निश्चित वेदना झाल्या असतील. याबाबत पवारांच्या भावना वेगळ्या असू शकतील, पण महाराष्ट्राच्या जनतेला पवारांचे हे वागणे पटणारे नाही.
ठाण्याच्या विकासात शिंदे यांचा मोठा वाटा आहे या पवारांच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ठाण्याचा विकास आणि तेथील राजकारण याबाबत पवारांकडे चुकीची माहिती आली असावी. त्यांना जर खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी राजन विचारे यांना विचारावे. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी मागील 30 वर्षांमध्ये घेतलेल्या अपार मेहनतीमुळे ठाण्याचा विकास झाला आहे. शिंदेंचे त्यातील योगदान अगदी नगण्य आहे.
राऊत यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट, नरेश म्हस्के यांनी केला. नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी शिंदेंवर गद्दारीचा आरोप करणे शोभत नाही. कारण बाळासाहेब ठाकरें यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेऊन खरी गद्दारी तर उद्धव ठाकरे आणि राऊत यांनीच केली. खुर्चीच्या लोभापोटी सोनिया गांधींच्या पायाशी लोळण घेतली. सावरकरांसारख्या क्रांतिकारी नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांना मिठ्या मारल्या. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याने काय करावे आणि काय करू नये हे सांगण्याएवढे राऊत मोठे झाले आहेत का? संजय शिरसाट म्हणाले की, राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणीतील शकूनीमामा आहे.त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीही त्यांच्यामुळेच फुटण्याच्या मार्गावर आहे. शिंदे यांच्या पुरस्कारावर भाष्य करताना राऊत यांनी वापरलेला दलाल हा शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. राऊतांना जोडे मारले पाहिजेत. राऊतांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, हाच त्यावर उपाय आहे.
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी हेदेखील यावरून राऊत यांना टोला लगावत म्हणाले की शिवसेना कोणी तोडली, राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय कोणामुळे घ्यावा लागला, एकनाथ शिंदे यांना पक्षातून बाहेर पडायला कोणी भाग पाडले? शिवसेना फोडणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात.
राष्ट्रवादी पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनीही पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले. पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यात काहीच गैर नाही. उलट पवारांनी आदर्श राजकारणी कसा असावा हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पवारांना राजकारण किती कळते हे अन्य कोणी सांगण्याची गरज नाही. संजय राऊत यांना एवढे दुःख वाटत असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरेदेखील अजित पवारांना भेटले आहेत.
पवारांकडून शिंदेंचा सत्कार आणि कौतुक! ठाकरे गट संतप्त! गद्दारांचे कौतुक कशाला?
