न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सही केली आहे.या आदेशानुसार ट्रान्सजेंडर व्यक्तींना महिलांविरोधात क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.या निर्णयामुळे खेळामध्ये निष्पक्षता येईल असं रिपब्लिकन नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र एलजीबीटीक्यू समर्थक आणि मानवाधिकार संघटनांनी हा निर्णय भेदभाव करणारा आहे असं म्हटलं आह.या आपल्या नव्या नीतीचा ऑलिपिंक समितीही विचार करेल अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. या बरोबरच ट्रम्प यांनी आणखी एका आदेशावर सही केली आहे. यानुसार इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टावरही त्यांनी निर्बंध घातले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं अयोग्य आणि विनाधार कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला होता या आदेशानुसार आयसीसीचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशिवाय या कोर्टाच्या तपासकामात सहकार्य करणाऱ्या लोकांविरोधात आर्थिक आणि व्हीसा निर्बंध घालण्यात आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच काही ऑर्डर्सवर सह्या केल्या होत्या. त्यामुळं लिंग विविधता आणि एलजीबीटी समुदायाच्या अधिकारांसाठी इतर देशात काम करणाऱ्यांना चिंता वाटत आहे. दुसरीकडे रुढीवादी, परंपरावादी गटांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिंग विविधता कार्यक्रम, ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटींच्या अधिकारांबाबत दिलेले आदेश “धोकादायक” आहेत, असं एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसंच इतर देशांमधील त्यांच्या कामाला त्यामुळे धोका निर्माण होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे